माझ्याबद्दल फारसं काही बोलावं असं खरंच काही नाही. अशी काही वेबसाईट बनवली म्हणून मी वेगळा ठरतो, असंही काही
नाही. वाचनातून चार-दोन शब्दांशी झालेली ओळख आणि डिझाईनचं असलेलं वेड या दोन्हींचा एकत्रित वर्कप्रपंच म्हणजे
‘तुझ्या-माझ्या कविता’.
माणसाची सहज प्रवृत्ती नेहमीच आनंदाच्या शोधात असते. वाटा निराळ्या असल्या तरी फुलपाखरं मध गोळा करणं थांबत
नाहीत. तसंच माध्यमं बदलली तरी रसिकतेची अनुभूती मात्र तीच राहते. थोडक्यात माझ्याजवळ जे थोडंफार आहे ते
डिजिटल स्वरूपातून इथं मांडण्याचा प्रयत्न केला; बाकी काही नाही. इंटरनेटच्या जंजाळात भटकताना कधी आजच्यासारखं
चुकून-माखून इकडं येणं झालंच तर सहज एखादी नजर फिरवून जा.
शेवटी आपल्या कृपाछायेत जगण्याचा अट्टहास
नेहमी असतोच. तो प्रत्ययास यावा हा अजून एक हट्ट. तसंही जे काही सांगायचं आहे ते कवितेतून सांगून मोकळा झालोय.
बाकी ‘आपण सुज्ञ असा!’
प्रांजळ अंतरंगात आभाराच्या शब्दांना मुळीच स्थान नसते. तरीही हेतुपुरस्सरपणे थोडं बाजूला येऊन आपले आभार
मानतो. आपण मैफलीत आलात, थोडावेळ रमलात; मला छान वाटलं. कृपया आपला अभिप्राय बाजूच्या रकान्यात लिहून पाठवलात
तर ती माझ्यासाठी आपल्या भेटीची पोचपावती ठरेल.
धन्यवाद!