परंपरांचा पाईक, ज्ञानाचा उपासक, शाहिरीचा आवाज आणि कुस्त्यांनी झपाटलेला निरपेक्ष व सर्वांगसुंदर गाव
कला, गुण, साहित्य, संस्कृती आणि रसिकतेने बहरलेलं लाडकं आणि लडिवाळ गाव
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा व सांस्कृतिकतेचा वसा आणि वारसा जपणारे दुधगंगा तीरावरील भव्य बाजारपेठ म्हणून गणले जाणारे गाव
सरवडे गाव कोल्हापूर शहरापासून ५० किमी. अंतरावर कागल व भुदरगड तालुक्याच्या सीमेवर दुधगंगा नदीकाठावर वसले आहे. घाटमाथ्यावरून कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी एक सोयीचा रस्ता व कर्नाटक-कोकणला जोडणारा निपाणी-फोंडा हा राज्य महामार्ग क्र. १६ सरवडे मधूनच जातो.
राधानगरी तालुका सह्याद्रीच्या सानिध्यात असलेल्या घाटमाथ्यावर असल्याने सरवडे गावात दाट झाडी व पर्जन्याचे प्रमाण अधिक आहे. हवामान साधारणतः हिवाळ्यात किमान १२ से. व उन्हाळ्यात ३५ ते ४० से. इतके राहते. गाव समुद्रसपाटीपासून ११४ मी. उंचीवर असून गावच्या बाजूने कृष्णेची उपनदी दुधगंगा वाहते. हे तालुक्यातील दुसरे मोठे गाव आहे.
इतिहासाची पाने धुंडाळताना असे दिसून येते की, प्राचीन भारतवर्षात जो दंडकारण्याचा भाग म्हणून ओळखला जायचा; त्याच अरण्यात सरवडे गाव सध्या वसलेलं आहे. मध्ययुगात इथे तुरळक वस्ती होती. राना-जंगलातून वाट काढत निघालेल्या नदीमुळे किनारी भागात सर्वप्रथम वस्ती झाली. त्याकाळची निपाणी-फोंडा ही वाट म्हणजे बैलगाडी व घोडेस्वारांचा महामार्गच होता.
छत्रपती महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज जिंजीवरून निसटल्यावर मार्च १६९६ मध्ये त्यांनी भुदरगडावर मुक्काम केला. त्यानंतर सरवडेमार्गेच दाजीपूरच्या जंगलातून शिवगडावर गेले. पुढे १७३२ मध्ये करवीरकर छ. संभाजींनी रामचंद्रपंत अमात्यांच्या नेतृत्वाखाली फोंड सावंतांचा बंदोबस्त करण्यासाठी घोणसरीच्या डोंगरावर फौज पाठवली होती. त्यावेळी रांगणा, भुदरगडसोबत सरवडे येथून कुमक मिळाली होती. सरवडेमध्ये करवीरकर छत्रपती राजवटीची लष्करी छावणी असल्याने येथील लष्कराने फोंड सावंतांचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
१७६२ च्या दरम्यान इनामदारकी म्हणून पाटणकर सरकार गावात आले. पंचक्रोशीत सरवडे हे पहिले गाव उभे राहिले. परंतु शत्रूच्या आक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी आपली वस्ती सध्याच्या कासारवाडा पाटणकर गावी हलवली. गावातील मुळचे रहिवासी असलेले कुलकर्णी हे पाटणकरांच्या इनामदारीत कुलकर्णी पदावर कारभार पहात होते. त्यांचा पुरातन ‘कुलकर्णीवाडा’ गावच्या जुन्या ग्रामपंचायतीमागे स्थित होता. त्यांना इनामात तीन गावे मिळाली होती. कुलकर्णी मळा आजही गावात प्रसिध्द आहे. त्यानंतर गावात चार पाटील घराणी आली. त्यामध्ये बेलजे, मालजे, पारावरील व लाल्या-आंद्या पाटील अशी नावे सांगितली जातात.
आदमापूरचे सदगुरू संत बाळूमामा यांचे गुरु म्हणजे मुळे महाराज. महाराजांची गावामध्ये वस्ती होती. सरवडे गाव महाराजांना विशेष प्रिय होता. पांडू तेली यांच्या जुन्या ओसरीच्या घरात महाराजांनी अनेकदा वास्तव्य केले आहे. गावात पूर्वी नाना पाटील यांचे हॉटेल प्रसिध्द होते. सरवडे गावामध्ये पूर्वीपासून आठवडी बाजार भरत असल्याची नोंद ग्रॅहमच्या रिपोर्टमध्ये मिळते.
इंग्रज काळात सरवडे गाव कोल्हापूर संस्थान – इलाखा पंचायत, करवीर मध्ये मोडत होते. गावची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळात याच संस्थानात झाली. सरवडे ग्रामपंचायतीची स्थापना सन १९२७ साली झाली. ज्यांना आधुनिक सरवडे गावचे संस्थापक म्हटले जाते असे भिमराव रेपे यांना गावचे पहिले सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला. श्री मन्महाराज कर्नल सर राजाराम छत्रपती साहेब यांच्या कारकिर्दीत इ. स. १९३९ मध्ये गावचे पुरातन मारुती मंदिर बांधण्यात आले.
७ मार्च १९४२ रोजी सरवडे येथे शेतकरी परिषद झाली. या परिषदेस हजारो शेतकरी उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष कोल्हापूर संस्थानचे शिक्षणमंत्री डॉ. पी. सी. पाटील होते. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी पक्षाच्या संयुक्त विद्यमाने गावात आणखी एक शेतकरी परिषद ३० ऑक्टोबर १९६३ रोजी पार पडली. गुळाला योग्य दर मिळावा म्हणून सन १९५२ मध्ये शिवाजीराव खोराटे यांच्या नेतृत्वाखाली सरवडे येथे गुळ परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटील होते.
कोल्हापूर संस्थानात मुलींच्या शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने ७ जुलै, १९४२ मध्ये राधानगरी तालुक्यातील मुलींची पहिली कन्या शाळा सरवडे गावी सुरु करण्यात केली. गावातील प्राथमिक शाळेस १९८८ चा जिल्हा परिषद तर १९९२ चा वनश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गाव नेहमीच अग्रेसर राहिला. ३१ मे १९५८ रोजी गावात समाजवादी नेते व्ही. एस. कामत यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी काळम्मावाडी धरण परिषद भरली. शिवाजीराव खोराटे यांनी परिषदेचे आयोजन केले होते. १९७७ मध्ये पार्वतीबाई कृष्णाजी मोरे यांनी दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून महाराष्ट्रातील पहिल्या महिला संचालिका होण्याचा मान मिळवला. गावचे भाग्य म्हणजे १९९० च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार निमित्ताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचा पदस्पर्श गावाला झाला आहे.
सरवडे ग्रामपंचायत आपली नव्वदी पूर्ण करून दैदिप्यमान ९५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. ऐतिहासिक ठेवा लाभलेले हे गाव सध्याच्या डिजिटल युगात कसे आहे? थोडक्यात....
सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत आणि खुशीत लपलेलं व दुधगंगेच्या सुपीक काठावर वसलेलं सकलसंपन्न सरवडे गाव. मुळात कोल्हापूर जिल्हा म्हणजे पश्चिम घाटातील हिरवाईचा शालू आणि राधानगरी त्या भरजरी शालूचा हिरवा पदर असा हा भाग.
पूर्वीचे सरवडे नावाचे खेडेगाव आणि आताचे सरवडे यात खूप मोठा फरक दिसून येतो. पूर्वी गावाने भीषण दुष्काळाची झळ सोसली आहे. शेजारी दुधगंगा नदी असली तरी ती पावसाळा वगळता कोरडीच वाहत असे. पण, नदीवर काळम्मावाडी धरण झाले अन् गावची स्थितीच पालटली. भर उन्हाळ्यातही दुधगंगा दुथडी भरून वाहताना गावकऱ्यांनी पाहिली. त्यातच दुधगंगा नदीच्या उजव्या कालव्याची निर्मिती झाली. हा हा म्हणता गावच्या शेतीने आपला रंग पालटायला सुरुवात केली. वाळवंटानजीकच्या एखाद्या मिठागराप्रमाणे भासणारी पांढरी शेती आता काळी-तांबूस होऊ लागली. मुळचा कस पिकांना जोम आणू लागला. गावची आर्थिक नाडी सुधारली. हळूहळू सर्वच क्षेत्रात गावचा कायापालट होऊन आजचे संपन्न व स्वावलंबी सरवडे गाव आपल्याला पाहायला मिळाले.
राधानगरी तालुक्यातील दुधगंगेच्या काठावर वसलेलं निसर्गरम्य सुंदर गाव म्हणजे सरवडे होय. गावाच्या मधून एक मोठी बाजारपेठ व त्या बाजारपेठेस जोडूनच प्रत्येक गल्ली अशी सुंदर रचना दिसते. अध्यात्माची ओढ आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणाऱ्या या गावात अनेक मंदिरे आहेत. गावात ग्रामदैवत विठ्ठलाईचे रचनात्मक मोठे मंदिर त्याच बरोबर भजन-किर्तनी रंगणारे महादेव मंदिर, नदीकाठचे दत्त व रेणुका मंदिर, टेकावरील बिरदेव मंदिर, टेकडीवरील संतोषी माता मंदिर, पुरातन हनुमान मंदिर व इतर छोटीमोठी मंदिरे आहेत. काही आकर्षक इमारती गावची शान वाढवतात. प्राथमिक विद्यालयाशेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्याचा फायदा गोर-गरिबांना होत आहे. ग्रामसचिवालयाची इमारत अगदी प्रशस्त असून त्यासमोर सुशोभित पटांगण आहे. तसेच छोट्या-मोठ्या अनेक संस्था, शाळा-कॉलेज यांनी गावचा चेहरा मोहराच बदललेला दिसून येतो.
याच कलाप्रेमी गावाने कला, साहित्य, वाङमय यासोबतच राजकीय, क्रिडा, सांस्कृतिक इ. क्षेत्रामध्ये फार मोठ्या पदापर्यंत मजल मारली. या सर्वांच्या यशामागे एक अदृश्य शक्ती आहे आणि ती म्हणजे गावचे ग्रामदैवत आदिमाया-आदिशक्ती श्री विठ्ठलाई देवी. देवीच्या आशीर्वादाने गावच्या मातीचा सुगंध गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणखी त्यापलीकडे सातासमुद्रापार दरवळत राहिला आहे.
सरवडे गावची बारा हजार लोकसंख्या असून गावात विविध जाती-पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. उद्योगशील लोक अशी प्रसिद्धी असलेले हे गाव उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून राधानगरी तालुक्यात सर्वात जास्त व्यवसायाची उलाढाल याच गावात होते. इथे जसे लक्ष्मीचे पूजक तसेच सरस्वतीचे उपासक. शैक्षणिकदृष्ट्या गावचा डंका अखंड महाराष्ट्रभर गाजतोय. विद्यार्थी व कलाकार मंडळीनी अटकेपार झेंडे फडकवून गावचे नाव गाजवले आहे. गावातील होतकरू शिक्षकांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रज्ञावंत विद्यार्थी घडवून उद्याचे भावी आदर्श नागरिक घडवण्याचे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. त्यामुळे या गावाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.
गायन, वादन, भजन, कीर्तन, लेझीम हे तर गावचं अविभाज्य अंग. महाराष्ट्राची एक प्रमुख पारंपारिक कला म्हणजे शाहिरी लोककला. अशा कलांमध्ये गाव कुठेही कमी नाही. गावातील दिग्गज व निपुण शाहिरांनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे.
सरवडेत सहकार चांगला रुजला आहे. येथील बँका, पतसंस्था, दुधसंस्था, सेवा-सोसायटी अविरत कार्यमग्न आहेत. अवघ्या महाराष्ट्रात गाजणारा राधानगरी तालुका शेतकरी संघाची पाळेमुळे याच गावात रुजली आहेत. दुधगंगा धरण, दुधसाखर कारखाना, शेतकरी संघ यांसारख्या अनेक विधायक कामाच्या पुर्ततेसाठी जुन्या जाणत्या मंडळींनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
जवळची पर्यटन स्थळे
आदमापूर - ६ किमी.
राधानगरी धरण - २२ किमी.
काळम्मावाडी धरण - २२ किमी.
रावतवाडी धबधबा - २४ किमी.
रामणवाडी धबधबा - २७ किमी.
दाजीपुर अभयारण्य - ४२ किमी.
कोल्हापूर - ४४ किमी.
कुणकेश्वर - ११० किमी.
देवगड - ११० किमी.
मालवण - १२४ किमी.
फोटोवर क्लिक करा
ग्रामपंचायत समिती
सरवडे ग्रामपंचायतीची स्थापना सन १९२७ मध्ये झाली. त्याकाळात सरवडे गाव कोल्हापूर छत्रपतींच्या कोल्हापूरच्या स्वतंत्र संस्थानात समाविष्ट होते. आदर्श छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर (सन १९२२) अवघ्या ४-५ वर्षात या ग्रामपंचायतीची निर्मिती केली गेली. पूर्वीपासून गावच्या मध्यभागी व सध्याच्या चावडी गल्लीसमोर ग्रामपंचायत कार्यालय चालत होते. पुढे सन २००३ पर्यंत म्हणजे ६६ वर्षे गावचा कारभार इथूनच चालवला गेला. हळूहळू गावचा आकार बराच विस्तारत गेला. दि. १५/०८/२००० मध्ये प्राथमिक विद्यालयासमोरील जागेत नवीन कार्यालयाची पायाभरणी व भूमिपूजन करण्यात आले. राधानगरी-भुदरगडचे तत्कालीन आमदार बजरंग देसाई यांच्या शुभहस्ते व मा. विजयसिंह मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पूजन करण्यात आले. पुढे जेमतेम तीन वर्षात बांधकाम पूर्ण झाले. दि. १६/०४/२००३ रोजी मा. पतंगराव कदम (पालकमंत्री-कोल्हापूर व उद्योगमंत्री-महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते व मा. अजितराव घोरपडे (पाटबंधारे राज्यमंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळेस सरपंच सौ. मालुबाई लाड यांच्या सदस्य कार्यकारीणीमार्फत कारभार पाहण्यात आला.
ग्रामपंचायतीचा आजवरचा कारभार पारदर्शकच राहिला आहे. देशाच्या दोन महत्वाच्या राष्ट्रीय सणाला पंचायतीच्या मैदानात झेंडावंदन केले जाते. शाळेतील मुलांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या दिवशी पंचायतीमध्ये वार्षिक तर दर महिन्याला मासिक ग्रामसभा भरते. ज्याला दरवर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतो. विविध विषयांवर चर्चा घडवल्या जातात. गावातील विविध प्रलंबित प्रश्न, सुचना, नवीन कल्पना अधोरेखित करून त्यांचा प्राधान्याने विचार केला जातो. या गोष्टी कार्यकारणीसमोर मांडल्या जातात.
ग्रामपंचायत सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
कार्यकारिणी सन २०१८-२०२३
सरपंच निवड दि. २५/०६/२०१३
१. सौ. मनोज्ञा दिग्विजयसिंह मोरे – सरपंच
२. सौ. शशिकला हिंदूराव मोरे – उपसरपंच
३. श्री. धोंडीराम कृष्णा पाटील (डी. के) – सदस्य
४. श्री. तानाजी बाबुराव कुंभार – सदस्य
५. श्री. घनशाम रामराजे पाटील – सदस्य
६. श्री. अरुणकुमार नामदेव साठे – सदस्य
७. श्री. किरण पांडुरंग गुरव – सदस्य
८. श्री. शहाजी बाबुराव पाटील – सदस्य
९. सौ. सुधा विजय व्हरकट – सदस्या
१०. सौ. सुनिता शिवाजी वागवेकर – सदस्या
११. सौ. आक्काताई पांडुरंग वागवेकर – सदस्या
१२. सौ. संगिता विनोद काळूगडे – सदस्या
१३. सौ. शांताबाई सुखदेव शिंगे – सदस्या
१४. सौ. सविता यशवंत कांबळे – सदस्या
श्री. एम. जी . बोटे – ग्रामविकास अधिकारी
महादेव पाटील (क्लार्क) • उदय पाटील (क्लार्क) • नितीन तळेकर (ऑपरेटर)
कृषीप्रधान देशातील कृषीप्रधान गाव. या गावात जितकं पिकवलं जातं त्यापेक्षा जास्त विकलं जातं. दुष्काळ आले, महावृष्टी झाली तरी गावची घरे, गुरे कधीच भुकेली राहिली नाहीत. स्वावलंबी व कर्तव्यनिष्ठ लोकांनी गावाला जगण्याची उभारी दिली.
एक आर्थिक सुबत्ता म्हणून गावाकडे पाहिले जाते. काही पारंपारिक व्यवसाय कमी-अधिक प्रमाणात चालू असले तरी नव्या उद्योगधंद्यानी जोर धरला आहे. गावात शहरी वारे वाहू लागले आहेत; पण गावचे निरागस गावपण अजूनही टिकून आहे. गावचा विकास होताना पाहून मला खूपच आनंद होतो.
माझा गाव मला अतिशय प्रिय आहे. बाहेरगावी गेल्यावरही मला माझ्या गावची आठवण येत राहते. इथे खूपशा शाळा आहेत. माझ्या गावात दरवर्षी खूप मोठा पाऊस पडतो. मग मला पावसात भिजायला खूप आवडते.
गावात पूर्वीपासूनच सारे सण-वार उत्साहाने साजरे केले जात आहेत. आजही तोच उत्साह व तीच उमेद दिसून येते. यात तरुणाईचा सहभाग लक्षणीय आहे. नवी पिढी जुन्या-जाणत्या लोकांकडून झांज, ढोल, लेझीम यांसारख्या ग्रामीण लोककला शिकण्याचा प्रयत्न करते आहे. ही आनंददायक गोष्ट आहे.
गावाविषयी लिहिताना माणसाच्या मर्मबंधातून येणारे प्रत्येक शब्द हे नेहमीच आपुलकीचे असतात. याच आपुलकीतून गावासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
मित्रहो, थोडीफार उसंत काढून या संकेतस्थळाच्या निमित्ताने तुम्ही माझ्या गावात फेरफटका मारलात, याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
आशा करतो, हा गाव तुम्हाला आवडला असेल. या गावाबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.
तुमचा अभिप्राय, सुचना किंवा नवीन कल्पना असतील तर त्या खालील रकान्यात लिहून पाठवा. अथवा तुम्ही माझ्याशी प्रत्यक्ष बोलू शकता. धन्यवाद!!